केमोथेरपी करून आता त्याच दिवशी घरी जाता येणार
मुख्यमंत्री वैदयकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न
नवी मुंबई / प्रतिनिधी -: कॅन्सरशी लढा देणाऱ्यांसाठी तसेच केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी नवी मुंबईच्या खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटल्सने सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे. या नवीन सुविधेमध्ये एकाच वेळी 15 रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकतात आणि त्यात अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. तज्ज्ञ डॅाक्टरांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी उपचार दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते या प्रभागाचे उद्घाटन करण्यात आले.
केमोथेरपी हा कर्करोगाच्या उपचाराचा आधारस्तंभ आहे. बहुसंख्य रूग्णांसाठी, हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेणे आणि त्यानंतर घरी परतणे हा प्रवास खूप त्रासदायक ठरतो. या प्रक्रियेमुळे त्यांना अनेकदा थकल्यासारखे वाटते. म्हणूनच, नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सने रुग्णांना केमोथेरपी उपचार घेण्यासाठी आणि त्याच दिवशी घरी परतण्यासाठी केमो डे केअर वॉर्डची स्थापना करण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
मेडिकवर हॉस्पिटल्सच्या माध्यमातून हे आतापर्यंत कर्करुग्णांना आजतगायत उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदान करण्यात आल्या आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी रुग्णालयाने आता आणखी एक पाऊल पुढे टाकत केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे. रूग्णालयाने घेतलेल्या प्रयत्नांमुळे कर्करोगाच्या रूग्णावर उच्च दर्जाचे व यशस्वी उपचार केले जातील अशी प्रतिक्रिया मंगेश चिवटे(मुख्यमंत्री वैदयकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख) यांनी यावेळी व्यक्त केली. याठिकाणी थेरेपी घेणाऱ्या सर्व कर्करुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तर कर्करोगासंबंधीत शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली आली. अवयव प्रत्यारोपणासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून २ लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याची प्रतिक्रिया श्री चिवटे यांनी व्यक्त केली.
नवीन डे केअर वॉर्ड हे कर्करोगाच्या रूग्णांसाठी उपचार पद्धती बदलत आहे. हा वॉर्ड रुग्णांसाठी सोयी आणि आराम या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देतो. केमोथेरेपी घेतल्यानंतर त्याच दिवशी ते घरी जाऊ शकतात हे रुग्णांना दिलासा देणारे आहे. वॉर्ड रुग्णांना आणि त्यांच्या प्रियजनांना केमोथेरपी-संबंधित दुष्परिणामांना प्रतिबंध आणि व्यवस्थापनाबाबत शिक्षित करेल. हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेत असलेल्या आणि प्रमाणापेक्षा जास्त केस गळत असणाऱ्या रुग्णांना केमो कॅप्स दिल्या जातील अशी प्रतिक्रिया डॉ डोनाल्ड जॉन बाबू( सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल, नवी मुंबई) यांनी व्यक्त केली.
मेडिकवर हॉस्पिटलचे प्रयत्न हे केवळ रोगावर उपचार करण्यासाठीच नव्हे तर,या आव्हानात्मक काळात रुग्णांना होणारा त्रास, त्यांची गैरसोय कमी करण्याचा देखील प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. माताप्रसाद गुप्ता( मेडिकवर हॉस्पिटल्सचे, केंद्र प्रमुख) यांनी सांगितले.