रेहाना बेगम सप्तरंगी कथांचे मनमोहक इंद्रधनुष्य
पनवेल वैभव, दि.16 (वार्ताहर) ः वाचनसंस्कृतीचे जतन करण्याची धडपड करणार्या माझ्या सारख्या साहित्य प्रेमी कार्यकर्त्याला एखादा सुंदर साहित्य प्रकार हाताळायला मिळाला की अनामिक ऊर्जा मिळते. रेहाना बेगम हा कथासंग्रह वाचण्याचा योग आला आणि ऊन पावसाच्या खेळातील मनमोहक इंद्रधनुष्य पडल्याचा भास झाला.संजय गणा पाटील यांच्या पहिल्या वहिल्या साहित्य कृतीने पहिल्याच प्रयत्नात मैदान मारले आहे. रेहाना बेगम या संजय गणा पाटील यांच्या कथा संग्रहातील सुरस कथा अत्यंत मुद्देसूद, संहितानिष्ठ आणि वाचकांना अंतर्मुख करायला लावणार्या आहेत. रेहाना बेगम या सिग्नेचर कथेसह मुंज्याचा कोंबरा,रक्ताचे नाते,सूड प्रतिशोध,जंगली मामा,ज्याचे त्याचे व्यासपीठ आणि वाल्या की वाल्मिकी? अशा अन्य सहा कथा वाचकांच्या भेटीला येतात.प्रत्येक कथेला इंद्रधनुष्यातील एका एका रंगासारखी छटा आहे. नेमक्या याच कारणामुळे रेहाना बेगम या दिर्घ कथेचे आणि अन्य सहा खुसखुशीत कथांचे निरनिराळ्या पातळ्यांवर समीक्षण करण्याचे योजले.
प्रास्ताविकाच्या परिच्छेदात मी या कथा ’वाचकांना वाचायला मिळतात’ या ऐवजी हेतुपुरस्सर पणे ’कथा वाचकांच्या भेटीला येतात’ असे नमूद केले आहे याचे कारण वाचत असताना त्यातील प्रसंग जसेच्या तसे डोळ्यापुढे उंभे राहतात आणि त्यातील पात्र आपल्या भेटीला आल्याचा भास होतो.कथा लिहिण्यापेक्षा ती रेखाटण्यावर संजय यांनी भर दिल्याचे जाणवते.ज्या पद्धतीने संजय यांनी कथा लिहिल्या आहेत ते वाचता हा त्यांचा पहिलाच कथा संग्रह आहे असे जराही वाटत नाही.वास्तविक पाहता रेहाना बेगम या दीर्घकथेचा गाभा रंजना ने केलेली चूक हा आहे. कथेतील विविध टप्प्यावर तिला याची जाणीव होत असल्याचे संजय पाटील यांनी रेखाटले आहे. या जाणिवेत त्यांनी विविध छटा आणि कंगोरे दाखवले आहेत त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कथानकाचा वेग कुठेही कमी होऊ दिला नाही की वाढवलेला नाही त्यामुळे हि कथा वाचकांना खिळवून ठेवते. कथेतील संहिता,आशय आणि पात्र वाचकांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी संजय पाटील यांनी समर्पक आणि संतुलित वाक्यांचा वापर केला आहे.अलंकारीक उपमा वैगरे टाळत साध्या सोप्या वाक्य रचनेवर जोर दिला आहे.योग्य वाक्य निवडीमुळे रेहाना बेगम सह कुठलीही कथा भरकटत जात नाही. समजा आपण लहान मुलांच्या सोबत खेळताना ठोकळ्यांचा मनोरा केला आहे. त्यातील मधला एखादा ठोकळा जर काढला तरी मनोरा कोसळतो. अगदी त्या ठोकळ्यांच्या प्रमाणेच संजय पाटील यांनी ठोक,चोख वाक्य वापरली आहेत. या लेखन शैलीचे निश्चितच कौतुक केले पाहिजे.शेवंता नाखविणीला लागलेली अखेरची घर घर ..येथून हि कथा सुरु होते,तिथपासून क्लायमॅक्स पर्यंत वाचकांना खिळवून ठेवण्यात संजय यांना शंभर टक्के यश आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.रंजना ते रेहाना बेगम या प्रवासात दुःख ,संघर्ष,त्याग,सचोटी,हिम्मत,माणुसकी हे सारे उत्तम प्रकारे कागदावर उतरवता आले आहे.कोळी बांधवांच्या बोली भाषेने आणि कथानकाच्या गरजेनुसार येणार्या हिंदी संवाद वाक्याने कथा जिवंत आणि रसरशीत वाटते. मुंज्याचा कोंबरा या काहीशा विनोदी अंगाने जाणार्या कथेतील खरी गम्मत कागदावर उतरवणे हे खरे तर क्लिष्ट असे कसब आहे.संजय गणा पाटील हाच क्लिष्ट प्रकार अगदी लिलया या कथेत लिहून गेलेत. धक्का तंत्र सुंदर रित्या हाताळले आहे.छोटे छोटे बारकावे टिपत एक सुंदर गोफण तयार केली आहे. मला खात्री आहे कि वाचकांना हि कथा पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल.कचरू चा कोंबडा विकण्यासाठीचा आणि नंतर घरी जाणार्या वाटेवर चालण्याचा संघर्ष अप्रतिम प्रकारे दाखवला आहे. बबन चा दांभिक पणा,सुलतान्याच्या बायकोचा प्रामाणिक पणा या सार्या आजच्या समाजातील वृत्ती आहेत. हि पात्र त्या वृत्तीचे प्रतिनिधी आहेत.शब्द आणि वाक्य यांच्या संख्येची मर्यादा सांभाळत या दांभिक आणि प्रामाणिक वृत्ती रेखाटणे अवघड असते. या वृत्ती म्हणजे आग आणि पाणी अशा परस्पर विरुद्ध गोष्टी, कागदावर उत्तम प्रकारे उतरवण्यात संजय यशस्वी झाले आहेत. कमीत कमी वाक्यातून जास्तीत जास्त आशय पोहोचविणे हि संजय पाटील यांची स्ट्रेंग्थ आहे. उदाहरणार्थ कचरू ची यथा तथा परिस्थिती वाचकांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी बरीच वाक्य खर्चावी लागली असती.परंतु संजय यांनी डोंगरावरून कोसळणारी थंडी कौलारू छपरातून व कुडाच्या भिंतीतून मिळेल त्या फटीतून घरात घुसत होती असे लिहीत कचरू ची परिस्थिती कळवली. सूड प्रतिशोध या मध्ये देखील डॉ अनुचा सूड रेखाटण्यावर भर देण्यापेक्षा ती सूड का उगवते? या कारणमिमांसेला आशय गाभा बनविले आहे.सुड कसा घेतला? याची पसारा कथा रंगवण्याच्या चाकोरी बद्ध लेखन शिरस्त्याला छेद दिल्याबद्दल संजय पाटील यांचे कौतुक केलेच पाहिजे. नाती तोडण्यापेक्षा टिकवण्यात खरी जीवनाची गम्मत आहे याची परिपूर्ण अनुभूती रक्ताचे नाते ता कथेत मिळते. जंगली मामा कथेतील जंगली मामाचा संघर्ष वाचकांना अंतर्मुख करेल. दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिमत्वाच्या ठायी असलेल्या विचार धारा एकत्र गुंफणे हे एक आव्हान असते. ज्याचे त्याचे व्यासपीठ या कथेत ही गुंफण चोख जमली आहे. संजय यांनी विचार धारा गुंफण्याचे आव्हान लिलया पेलले आहे. वाल्या कि वाल्मिकी? या कथेत आजच्या वैद्यकीय व्यवसायातील चिखल स्पष्ट पणे नमूद करताना संजय यांनी मागे पुढे पाहिलेले नाही. या क्षेत्रातील सेवाभाव हरपल्याची खंत जाहीर पणाने यातून ते व्यक्त करतात. वास्तव असले तरी इतक्या बेधडक ते लिहिण्याची कुणी हिम्मत दाखवत नाही. संजय पाटील यांनी मात्र हे धाडस केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! उत्तम छपाई,वाचनीय फॉन्ट,उच्च दर्जाचे कागद मटेरियल यामुळे पुस्तक सुंदर झाले आहे. चेरी ऑन टॉप म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठ! के सय्यद ने रेहाना च्या कपाळावर टिकली दाखवत मुखपृष्ठ बोलकं केले आहे.प्रकाशनाच्या पश्च्यात अवघ्या एक आठवड्यात दुसर्या आवृत्तीची तयारी करायला लागत आहे. हे खर्या अर्थाने संजय यांच्या साहित्य कृतीचे यश आहे. वाचकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतोय,पुढल्या साहित्य कृती त्यांच्या ठायी रुंजी घालत आहेत.ज्यांनी ज्यांनी रेहाना बेगम वाचलंय ते सगळे जण संजय गणा पाटील आता काय लिहून प्रसिद्ध करतील याकडे डोळे लावून बसले आहेत. सौ.मनीषा मुरहरी केळे संचलित, ठाण्याच्या संस्कृती प्रकाशनचा खमका आधार संजय पाटील यांना लाभला आहे.कुठल्याही गोष्टीची समिक्षा संतुलित असावी असा दंडक आहे.तो पाळलाच पाहिजे म्हणून त्रुटी किंवा उणीवा नमूद करण्याची औपचारीकता करेन. पहिला कथासंग्रह किंबहुना पहिला गद्य साहित्य प्रकार असला तरीही त्रुटी,उणीवा फारशा नाहीत.मुद्रित शोधन या मुद्द्यावर भर द्यावा लागेल. दुसर्या आवृत्तीत संजय त्याची निश्चितच काळजी घेतील याबद्दल जराही दुमत नाही. रेहाना बेगम कथेत अक्रम तांबे आणि पार्वती बाय हि पात्रे अनन्य साधारण महत्व बाळगून आहेत. त्यांचे मृत्यू रेखाटण्यात त्यांना अधिक स्पेस मिळायला हवी होती असे वाटते. कथानकाचा वेग थोडा धीमा करून कारुण्य आणखीन वाढवल्यास कथेला कोंदण प्राप्त होऊ शकते.संजय गणा पाटील यांचा रेहाना बेगम हा कथा संग्रह आवर्जून वाचावा या पठडीतला झाला आहे.संजय गणा पाटील यांच्या साहित्य प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!
फोटो ः पुस्तकासह लेखक संजय गणा पाटील