स्पर्धेला अभिनेत्री दिव्या पुगावकर (आनंदी)यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल वैभव, दि.12 (वार्ताहर) : ओरायन मॉलने रायगडमधील महिलांसाठी आयोजित केलेली मोदक स्पर्धा ही गृहिणींच्या पाक कौशल्याला वाव देणारी असून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आज बघून अत्यानंद झाला असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री व स्टार प्रवाहावरील आनंदी या भूमिका साकारणार्या दिव्या पुगावकर (आनंदी) यांनी या मोदक स्पर्धेच्या यशस्वी गृहिणींना बक्षिस देताना केले.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर (आनंदी) यांच्यासह ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, डायरेक्टर मनन परुळेकर, दिलीपभाई करोलिया, प्रियांका मॅडम यांच्यासह मोठ्या प्रमाणात गृहिणी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. एकूण 50 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक असे मोदक बनविल्याने परिक्षकांना सुद्धा नंबर काढणे मोठे कठीण काम होते. दरम्यान पनवेल शहराच्या मध्यवर्ती वसलेला एकमेव मॉल ओरायन मॉल ही आता पनवेलची ओळख बनलेला असून अनेक आधुनिक व नवीनतम ब्रँडच्या वस्तू मिळण्याचे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकमेव ठिकाण आहे. हा मॉल नुसते खरेदीचे ठिकाण नसून येथे स्थानिक संस्कृती व परंपरा जोपासण्याचे ही काम केले जाते. ओरायन मॉल संपूर्ण वर्षभर लोकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्या कलेला वाव मिळण्यास उद्युक्त करते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गणपती आगमनाचे निमित्त साधून सर्व रायगड वासियांसाठी मोदक स्पर्धा आयोजित करीत असल्याची माहिती मंगेश परुळेकर यांनी यावेळी दिली. मोदक हा नुसता एक खाद्यपदार्थ नसून तो एक भक्ती, परंपरा आणि भावनेचे प्रतीक आहे. गणेश चतुर्थीला गणपतीसाठी केलेला प्रसाद मोदक आता संपूर्ण जगभर एक आवडता पदार्थ म्हणून पोहोचलेला आहे. 2017 मध्ये ओरायन मॉल सुरू झाल्यापासून मोदक स्पर्धा ही स्थानिक गृहिणींच्या पाक कौशल्याला वाव मिळवून आपली कला लोकांपर्यंत पोहोचविण्याची एक उत्तम संधी आहे. दरवर्षी 50 हून अधिक सहभागीना ह्या उपक्रमात भाग घेऊन आपल्या पाक कौशल्याचे प्रदर्शन करण्याचे संधी मिळते. ही केवळ नुसती स्पर्धा नसून आपल्या पाककलेचा वारसा व आपले कौशल्य लोकांपुढे ठेवण्याची एक संधी आहे. प्रत्येक व्यक्तीची पदार्थ बनवण्याची स्वतःची अशी एक वेगळी पद्धत असते. व त्यात असलेले वेगवेगळे घटक व त्यांचे अनोखे मिश्रण आपल्या स्वतःच्या पद्धतीने बनवून प्रत्येकाचा मोदक हा वेगळा बनतो. पारंपारिक उकडीचे मोदक व नवनवीन फ्लेवरचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून स्पर्धक या उपक्रमास एका अति उच्च शिखरावर पोहोचवतात. ओरायन मॉल स्थानिकांच्या कलागुणांना वाव देऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे. अशा ह्या उपक्रमास अनेक स्थानिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आम्हाला त्याचा अभिमान आहे व या वर्षी सुद्धा अशाच प्रतिसादाची अपेक्षा आहे. यावेळी प्रथम क्रमांक शिवानी घरत यांनी पटकाविला त्यांना आयपॅड बक्षिस देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक भाग्यश्री पाटील यांना मिळाला त्यांना ट्रॅव्हल बॅग देण्यात आली. तृतीय क्रमांक कविता दळवी त्यांना मिक्सर देण्यात आला. तर उत्तेजनार्थ बक्षिस रितीका गायकवाड यांना मिळाला त्यांना फेस किट देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक सागर चव्हाण यांनी केले.
फोटो ः मोदक स्पर्धा बक्षिस विजेते