पनवेलकरांच्या मालमत्ता करावरील शास्ती माफ; मुख्यमंत्र्याची घोषणा..
खासदार श्रीरंग बारणे यांच्या मागणीला यश..
पनवेल वैभव / दि.13( वार्ताहर) पनवेल विभागातील नैना प्रकल्प, गावठाण विस्तार, पनवेल महापालिकेचे मिळकत करा संदर्भात विविध समस्या नागरिकांना भेडसावत होत्या.त्यामुळे या समस्या सोडवण्याची व विविध उपाय योजना करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या समस्या संदर्भात शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी देखील पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मालमत्ता करा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून समस्या सोडविण्याचे मागणी केली होती. त्या अनुषंगाने पनवेलकरांच्या मालमत्ता कराची शास्ती माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या चाचणी वेळी बोलताना दिले. त्यामुळे पनवेलकरांच्या मालमत्ता करा वरील बोजा काही अंशी कमी होणार आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही मालमत्ता कराचा तिढा सुटलेला नाही. सिडको कडून सेवा हस्तांतरित करून घ्यायला महापालिकेला विलंब लागला. तसेच आजूबाजूच्या महापालिकांच्या तुलनेत पनवेलच्या मालमत्ता कराचा दर हा जास्त आहे. तो कमी असल्याचे प्रशासन भासत असले तरी तांत्रिकदृष्ट्या निश्चित करण्यात आलेला कर हा अवास्तव आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारकडून पुनरावलोकन होणे आवश्यक आहे. जेणेकरून अवास्तव आणि जास्त कराचा बोजा रहिवाशांवर लादला जाऊ नये. त्याचबरोबर पूर्वलक्षी आणि दुहेरी मालमत्ता कर याव्यतिरिक्त त्यावर लावण्यात येणाऱ्या शास्ती पूर्णपणे माफ करण्यात यावी अशी विनंती समस्त पनवेलकरांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली होती. यासंदर्भात नगर विकास विभाग आणि महापालिका प्रशासनाला आदेश देऊन पनवेलकरांना न्याय द्यावा अशी मागणी रामदास शेवाळे यांनी मागील वर्षी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी शास्ती माफ केल्याचा निर्णयाचे पनवेलकरांनी स्वागत केले आहे.

कोट
बऱ्याच वर्षीपासून पनवेल करांच्या मालमत्ता कराचा तिढा सुटला नाही. या संदर्भात मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या समवेत हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला होता. त्या अनुषंगानेच  मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याचा निर्णय म मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे मालमत्ता धारकांना दिलासा मिळणार आहे.
रामदास शेवाळे
शिवसेना जिल्हाप्रमुख पनवेल
Comments