जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त श्री आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदिवासी आश्रम शाळेत उपक्रम संपन्न ..
आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदिवासी आश्रम शाळेत उपक्रम संपन्न 
          
पनवेल / प्रतिनिधी : -
१५ ऑक्टोबर या "जागतिक हात धुवा " दिनानिमित्त तसेच "वाचन प्रेरणा दिनानिमित्त " रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज व जाणीव सामाजिक सेवा संस्थेमार्फत कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन संचालित श्री आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदिवासी आश्रम शाळा वाकडी, ता पनवेल येथील विद्यार्थ्यांसाठी दोन उपक्रम आयोजित करण्यात आले होते. 
       क्लबचे पास्ट प्रेसिडेंट रो. डॉ. विजयकुमार कुलकर्णी यांनी सोप्या भाषेत हात धुण्याचे महत्व, घ्यावयाची काळजी, हात धुण्याची तंत्रशुद्ध पद्धत, योग्य पद्धतीने हात न धुतल्याने होणारे आजार इ. बाबत सविस्तर मार्गदर्शन केले आणि हात योग्य पद्धतीने धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी त्यानुसार प्रात्यक्षिक करून दाखविले. 
त्यानंतर विद्यार्थ्यांना हात स्वच्छ करण्यासाठी आजच्या दिनाचे औचित्य साधून डेटॉल साबण वितरित करण्यात आले. 
            आपले भूतपूर्व राष्ट्रपती कै. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम सर यांच्या जयंतीनिमित्त *"वाचन प्रेरणा दिनाची"* माहिती आणि वाचनाचे महत्व क्लबचे प्रेसिडेंट रो. गोरेगावकर यांनी सांगितले. या दिनाच्या निमित्ताने विविध  (डॉ ए पी जे अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ आंबेडकर, महात्मा फुले, सिंधुताई, आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे मनोगत, संभाजी महाराज, व्यक्तिमत्व विकासावरील पुस्तके, विविध शास्त्रज्ञ यांची चरित्रे, संस्कृती दर्शन, रायगड जिल्ह्याची समग्र माहिती इ )पुस्तके मुलांना देण्यात आली .या पुस्तकांवर आधारित विद्यार्थ्यांसाठी क्लबमार्फत एक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. "अग्निपंख" या ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या पुस्तकातील एक उतारा एका विद्यार्थीनीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचून दाखविला.
        शाळेच्या मुख्याध्यापिका सौ क्रांती पाटील मॅडम यांनी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजला आणि जाणीव सामाजिक सेवा संस्थेला धन्यवाद दिले आणि भविष्यात विद्यार्थ्यांसाठी असेच विविध उपक्रम आयोजित करावेत असे आवाहन केले.
वरील दोन्ही उपक्रम जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाणीवच्या आजीव सदस्या प्रतिभा जाधव यांनी केले. या कार्यक्रमास रो. डॉ.विजय कुमार कुलकर्णी , रो. काशिराम पाटील, क्लब प्रेसिडेंट आणि जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रो. गोरेगावकर आणि जाणीव संस्थेचे श्री गोंधळेकर, श्रीमती प्रतिभा जाधव आणि श्रीमती चारूशिला कुंभार आदि उपस्थित होते. 
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. क्रांती पाटील मॅडम, शेख सर आणि सौ.अंजली राऊत मॅडम उपस्थित होत्या. आजच्या या दोन्ही उपक्रमासाठी सुमारे २००  विद्यार्थी उपस्थित होते.
रो. पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Comments