परदेशात दिवाळी फराळ पाठविण्यासाठी नवी मुंबई डाक विभागाची विशेष सेवा सुविधा..
पनवेल वैभव वृत्तसेवा - : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सुख,समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
दिवाळी सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ...लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरच काही..! आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. मात्र या विदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचवण्यासाठी डाक विभाग पुढे सरसावला आहे. घरात बनवलेल्या आईच्या हातचा फराळ आपल्या प्रियजनांना पाठवून खमंग खुसखुशीत चुरचुरीत दिवाळी फराळाचा आस्वाद आपल्या मित्र, परिवाराला पोस्टाच्या सहकार्याने नाममात्र दरात दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक नितीन येवला यांनी केले आहे.
नवी मुंबई क्षेत्रातील बरेचसे उच्चशिक्षित तरुण-तरुणी जगातील विविध देशात कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने भारताचे नाव उंचावत आहेत. दिवाळी सणाला आपल्या मुलांपर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. यांचे उत्तर नवी मुंबई डाक विभागाने शोधून काढले आहे. नवी मुंबई डाक विभागाने यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा नवी मुंबईमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या सुविधे अंतर्गत पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही खास पोस्ट ऑफिसेस मध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षीत पॅकेजींग आणि विशेष बुकींग काऊंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, ITPS या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे दर खाजगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत. सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत.
नवी मुंबई डाक विभागाच्या या सुविधेमुळे आता पालक वर्ग आपल्या विदेशातील मुला मुलींना तसेच प्रियजनांना खास घरघुती आणि भारतीय बनावटीचे फराळ पाठवू शकणार आहेत.
भारतीय डाक विभाग जनतेच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध आहे. डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय मेल सेवांचे दर इतर खाजगी सेवांपेक्षा कमी आहेत. जगभरातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवण्यासाठी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये भेट देऊन डाक विभागाच्या सेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा.
नितीन एस येवला
वरिष्ठ अधीक्षक,नवी मुंबई डाक विभाग