आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देणार - नेते ऍड.प्रकाश बिनेदार
पनवेल (प्रतिनिधी) भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची अपार श्रद्धा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते सर्व समाजाच्या हिताचे विधायक कार्य करत असतात, त्यामुळे समाजाच्या अधिक उन्नतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देऊन विजयी करणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस, मागासवर्गीय समाजाचे नेते ऍड. प्रकाश बिनेदार यांनी केले.
ऍड. प्रकाश बिनेदार यांनी पुढे बोलताना सांगितले कि, आमदार प्रशांत ठाकूर यांनी दलित मागासवर्गीय सर्व समाजाचा नेहमीच विचार केला आहे. इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात फलक झळकावले म्हणून एक दिवसाचे त्यांचे निलंबन झाले होते आणि बाबासाहेबांसाठी त्यांनी हे निलंबन स्वीकारून त्यांच्याप्रती असलेल्या आस्थेची जाणीव समाजाला दिसली आहे. महाड येथील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेल्या चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे पंजाब राज्यातील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोन प्रक्रिया करुन चवदार तळे सौंदर्यीकरण व जलशुध्दीकरण करण्यासाठी ६५.५२ कोटी रुपये मंजूर करून त्याप्रमाणे या कामाची पुढील कार्यवाही होत आहे.
त्याचप्रमाणे पनवेल आणि परिसरात अनेक ठिकाणी बुद्धविहार आणि समाजमंदिरे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत उभारण्यात आली. कामोठे येथे नालंदा बुद्धविहाराची स्थापना केली. नवीन पनवेल येथे भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भवन निर्मितीला पाठबळ दिले. तसेच बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार, शिवकर, रोडपाली अशा अनेक ठिकाणी बुद्धविहारांच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले आहे. समाजाचा हित जपणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ओळखली जाते. त्यामुळे सर्व समाजाच्या हिताच्या योजना यापुढेही सुरु राहण्यासाठी महायुतीचे सरकार कायम राहणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद करत पनवेल विधानसभा मतदार संघातील सर्व समाज, दलित, बौद्ध, चर्मकार, मातंग समाज लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे २० नोव्हेंबरला कमळ निशाणीसमोरील बटन दाबून आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्णय सर्व समाजाने घेतला आहे. असेही प्रकाश बिनेदार यांनी अधोरेखित केले.