आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी ..
पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे आज (दि. १२) केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी आठवडे बाजार चालतात. सदरचे आठवडे बाजार हे कोणत्याही अधिकृत परवानग्या न घेता काही लोकांच्या दादागिरीने अवैधपणे चालविले जात असल्याचे व काही अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले असून स्थानिक नागरिकांकडून तसेच बाकीच्या अधिकृत व्यावसायिकांकडून तक्रारी येत आहेत. तसेच अवैधपणे कोणतीही परवानगी अथवा परवाना न घेता रस्त्यावर हातगाडयांवर धंदे करत आहेत. सदर हातगाड्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून हातगाडयांवर व्यवसाय करणारे हे मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी लोक असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तसेच आठवडा बाजार व हातगाड्यांवर अनैतिक धंदे चालत असल्याच्या तक्रारीही येत आहेत. नागरिकांकडून वेळोवेळी यासंदर्भातील तकारी महानगरपालिकेकडे करण्यात आल्या आहेत, परंतू महापालिका अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये झाली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. सदरचे विना परवानगी आठवडे बाजार व अवैधपणे चालणाऱ्या हातगाड्यांवर अतिशय संथगतीने कारवाई चालू आहे ती कारवाई जलदगतीने पूर्ण करण्याची गरज आहे. हि बाब लक्षात घेता कोणाच्याही दबावाला बळी न पडता आठवडे बाजार व हातगाडयांवर पूर्णपणाने कारवाई करावी, अन्यथा दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून महापालिकेच्या विरोधात व्यापक आंदोलन करणार असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.