आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल (प्रतिनिधी)मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन ही त्रिसूत्री अंगीकारून आगरी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आगरी युथ फोरम या संस्थेच्या वतीने गेली २० वर्ष अखिल भारतीय आगरी महोत्सवाचा आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येते. यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या आगरी महोत्सवाचे शानदार उद्घाटन संपन्न झाले. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली येथे या विसाव्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन १० डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, आगरी महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, चिटणीस प्रकाश भंडारी, खजिनदार पांडुरंग म्हात्रे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोंबिवली शहरात गेली वीस वर्ष आगरी महोत्सवाचे आयोजन आगरी युथ फोरमच्या वतीने करण्यात येत आहे. पारंपारिक सांस्कृतिक स्वरूप या महोत्सवाला वीस वर्षे आहे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी डोंबिवली शहरात कुठलाही भेदभाव न करता या महोत्सवाचा आयोजन आपण करता आणि त्यामुळेच या महोत्सवाला एक सांस्कृतिक ओळख प्राप्त झाली आहे आगरी युथ फोरमच्या वतीने आपण या शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुद्धा आयोजित केला होता हे आम्ही सर्वांनी आणि महाराष्ट्राने पाहिले आणि याचा सार्थ अभिमान मला आहे असे प्रतिपादन या उद्घाटन सोहळा वेळी माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
आपण आपली संस्कृती जपली पाहिजे ती रुजवली पाहिजे आणि ती मोठीही केली पाहिजे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उद्घाटनाप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले संघर्ष केला की यश नक्की मिळते याची प्रचिती विमानतळाच्या नामांतराच्या आंदोलनावेळी आली. आपण आगरी कोळी सर्व समाज एकत्र होऊन या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालात. प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि बा पाटील साहेबांचे नाव येत्या काळात विमानतळाला दिले जाईल यात कोणतीही शंका नाही. या आंदोलनात डोंबिवलीकरांनीही मोठे योगदान दिले, याचा सार्थ अभिमान मला आहे. आगरी कोळी भाषा, आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.