आ.महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
पनवेल (प्रतिनिधी) तिसऱ्या मुंबईच्या अनुषंगाने नैना प्रकल्प विकासाच्या दृष्टिकोनातून गेमचेंजर होऊ शकतो मात्र त्यासाठी सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील पाऊल उचलावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटिसा तात्काळ थांबवाव्यात तसेच शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई होऊ नये, अशी आग्रही मागणी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
नैना प्रकल्प संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका यापूर्वीच मांडण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विधिमंडळात बोलताना आमदार महेश बालदी यांनी म्हंटले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नात असलेली तिसरी मुंबई वसण्याचा उद्देश आहे. नैना हा सुंदर प्रकल्प आहे. तिसऱ्या मुंबईचा कंजेक्शन व अनधिकृत बांधकामांना या प्रकल्पातून अटकाव होईल. मात्र सिडको शेतकऱ्यांना घाबरण्याचे काम जास्त करत आहे आणि प्रत्यक्ष रुपी काम कमी करत आहे. सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक यांनी आजपर्यँत या संदर्भात लोकप्रतिनिधींसोबत एकही बैठक घेतली नाही. उलट ५०३८ घरांना तोडक नोटीस दिल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांनी बनवलेले हॉटेल धाबे कशाप्रकारे तुटणार आहेत त्याचे व्हिडीओ विरोधकांनी निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा करून वायरल केला. त्याचा फटका आम्ही निवडणुकीत सहन केला. हा प्रकल्प शेतकऱयांना विकसित ४० टक्के जागा मिळणारा आहे, पण प्रशासकीय हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प लांब चालला आहे. या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांची करायच्या कामांची विचारणा शेतकऱ्यांना नैना प्राधिकरणाने केली नाही. नवीन युडीसीपीआर प्रमाणे काय सुविधा देण्यात येणार आहेत त्याची माहिती दिली पाहिजे. विरोधाला विरोध करणारी लोकं वेगळी आहेत. पण हा प्रकल्प व्हावा अशी इच्छा असली तरी त्याच्या बदल्यात शेतकऱयांना काय मिळणार आहे. शेतकरी बिनघराचा होणार नाही हा विश्वास जेव्हा सिडको पटवून देईल तेव्हाच हा प्रकल्प पुढे जाणार आहे, असेही आमदार महेश बालदी यांनी अधोरेखित करत सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील पाऊल उचलावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना येणाऱ्या नोटिसा तात्काळ थांबवाव्यात तसेच घरांवर कोणतीही तोडक कारवाई होऊ नये, अशी मागणीही आमदार महेश बालदी यांनी औचित्याच्या मुद्यातून मांडली.