कळंबोलीत मराठा समाज आक्रमक - निवेदन सादर..
कळंबोली : (दिपक घोसाळकर)
अमानवी हिंसक प्रकारे कै. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर हत्ये मध्ये समाविष्ट असणाऱ्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार केला जात आहे असा आरोप करून कळंबोली वसाहतीमध्ये मराठा समाजाला न्याय देण्यासाठी लढणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध अनुचित शब्दप्रयोग करून जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. कळंबोली तसेच नवी मुंबईत अठरा पगड जातींना सोबत घेऊन बहुजन वर्ग गुण्या-गोविंदाने सलोख्याने राहत असताना जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकल मराठा समाजातर्फे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता.
बीडमध्ये मराठा बांधव संतोष देशमुख यांची अमानवी पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली .या हत्याचा निषेध सकल मराठा समाजातर्फे राज्यभर सुरू आहे .याबाबत कै .संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. मात्र या संतोष देशमुख हत्याकांडला जातीय वळण दिले जात असून आरोपींना पाठीशी घालण्यासाठी काही विशिष्ट समाजाचे समाज बांधव म्हणून जरांगे पाटील यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगत आहे .कळंबोली मध्ये सुद्धा वंजारी समाजातर्फे तीन ते चार दिवसापूर्वी लेखी निवेदन देऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जरांगे पाटील यांच्या विरुद्ध भडकावू शब्दप्रयोग करून जाती-जाती तेढ निर्माण करण्यात आल्याचा आरोप मराठा समाजाच्या बांधवांकडून केला जात आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव कळंबोली पोलीस ठाण्याच्या बाहेर एकत्र जमा झाले व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कार्यवाही व सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप ची खातर जमा करून कारवाई करण्याची मागणी मराठा समाज बांधवांनी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्याकडे केली. यावेळी मराठा समाजातील सकल मराठा समाज कळंबोली उपाध्यक्ष संदीप जाधव,विनोद साबळे ,किरण नागरगोजे,लीना गरड, रत्नमाला शिंदे, प्रियांका संदीप जाधव, संतोष जाधव, तुषार सावंत, स्वप्नील काटकर,अनुरज लेकुरवाळे, ज्योतीराम साळुंखे सह तरुण आबाल वृद्ध ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मराठा बांधवातील एका शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देऊन जरांगे पाटील यांच्या विरुद्ध अवमानकारक शब्दप्रयोग करून जाती जाती तेढ निर्माण केली ,त्यांच्यावरती गुन्हा दाखल किंवा कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. यावेळी बोलताना मराठा समाजाचे नेते विनोद साबळे म्हणाले की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून कळंबोली सह नवी मुंबईत गुण्यागोविंदाने राहत आहोत. आमच्या समाजाच्या न्याय हक्कासाठी अद्याप पर्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही अनेक मोर्चे काढले. अठरापगड जाती तसेच बहुजन वर्गास सोबत सर्वजण सलोख्याचे संबंध राखून गुण्या गोविंदाने समाज हीत जपत आले आहेत. कोणत्याही हत्तेला सामाजिक वळण न देता हत्याही हत्या समजून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार केला जाऊ नये ,म्हणून जरांगे पाटील यांच्या विरुद्ध काही समाजकंटकांनी गरळ ओकुन बदनामीकारक शब्दप्रयोग केले .त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी .सलोखा राखण्याचे बंधन हे सर्व समाज बांधवांना असल्याने आम्हीही शांततेच्या मार्गाने याचा जाहीर निषेध करीत आहोत.
यावेळी निवेदन स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते म्हणाले की अद्याप पर्यंत वंजारी समाजाकडून देण्यात आलेल्या निवेदनावर मी कार्यवाही केलेली नाही .याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल .आपणही दिलेल्या तक्रारीबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन ऑडिओ व्हिडिओ सर्व तपासून संबंधितांवर कारवाही केली जाईल किंवा त्यांना योग्य ती समज दिली जाईल. आपण सर्वांनी कायदा सुव्यवस्था सांभाळून समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.