एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे - आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी वासियांना दिला दिलासा ...
आ. प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी वासियांना दिला दिलासा ...

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता दिली आणि झोपडपट्टी धारकांना दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल, आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही, असे त्यांनी आश्वासित करून झोपडपट्टी वासियांना मोठा दिलासा दिला. 
          विकास आराखडा आणि त्या अनुषंगाने शिवाजीनगर, मालधक्का, पंचशील नगर, नवनाथ नगर या झोपडपट्टी धारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे. त्यामुळे येथील झोपडपट्टी धारकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन या विषयावर योग्य मार्ग काढण्याची मागणी केली. त्यानुसार हि बैठक मार्केट यार्ड येथे पार पडली. या बैठकीस पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक एडवोकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका सुशीला घरत, वृषाली वाघमारे, मछिंद्र झगडे, अशोक आंबेकर, सामाजिक कार्यकर्त्या जरीना शेख, रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, संजय जाधव, चंद्रकांत मंजुळे व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीस झोपडपट्टी धारक बंधू भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होते.  
          आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, झोपडपट्टी धारकांनी दिशाभूल व फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहावे. पनवेल मधील शिवाजीनगर, मालधक्का, पंचशील नगर, नवनाथ नगर आदी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून होणार असून सर्व झोपडपट्टी धारकांना पक्के घरी देण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेत अंतर्गत येणाऱ्या या झोपडपट्टीचे पुनर्वसन सरकारच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची असून या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन साठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वेक्षणदेखील सुरु आहे. ज्या ज्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागेल त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करू असे सांगून कोणताही झोपड्पट्टीधारक बेघर होणार नाही याची काळजी घेऊ त्यांना परवडेल अशी घरे शासनाच्या नियमातून व माध्यमातून देण्याचे आश्वासन दिले. 
           झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु असताना फॉर्म भरण्यासाठी काही लोकांकडून झोपडीधारकांकडून पैसे मागितले जात आहे, त्यामुळे गरीब माणसाकडून का पैसे घेता.असा सवालही त्यांनी उपस्थित करून झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल करणाऱ्यांचा खरपूस समाचारही घेतला. झोपडपट्टी वासियांना चांगली आणि पक्की घरे मिळाली पाहिजेत हा आमचा कायम आग्रह राहिला आहे. आणि त्यानुसार तशी मागणी आणि पाठपुरावा आम्ही केला आहे. प्रत्येक झोपडपट्टी वासियाला घर मिळाले पाहिजे यासाठी पनवेल महापालिकेची जबाबदारी आहे. व्यापिठावरील भाजपचे आम्ही सर्व सक्षम आहोत आणि तशी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. असे सांगतानाच फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी करत फसवणूक करणाऱ्याला आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले. झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनासाठी पालिका आयुक्तांची भेट घेऊ, गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देत तुम्हाला सर्वाना न्याय भेटेल आणि जो पर्यंत पुनर्वसनाच्या बाबतीत न्याय मिळत नाही तो झोपड्पट्टीवासियांच्या एकाही घराला हात लावू देणार नाही, असा विश्वास देत भाजप तुमच्या पाठीशी काल होता आज आहे आणि उद्याही राहील, असे आश्वासित करत नागरिकांमधील संभ्रावस्था दूर केली. या बैठकीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
Comments