श्री. सोमजाई माता उत्सव उत्साहात साजरा...
नम्रता मालकर ठरल्या 'खेळ पैठणीचा' स्पर्धेच्या विजेत्या ; महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
 
पनवेल (प्रतिनिधी): सांगवी तर्फे वासरे (ता. कर्जत) येथे श्री सोमजाई माता उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा झाला. या उत्सवानिमित्त रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकारातून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमजाई माता उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी आयोजित हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या खेळाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तळवली येथील नम्रता मालकर या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. तर  संतोषी मिरकुडे (नेरळ मोहाचीवाडी) या व्दितीय आणि श्रेया कुंभार (खांडपे) या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

           श्री सोमजाई माता उत्सवानिमित्त पहाटे देवीची काकड आरती,  श्री. सत्यनारायण महापूजा, हरीपाठ, चक्रीभजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भारती घारे आणि माजी सरपंच नमिता घारे यांनी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. सावल्यांची जणू सावली मालिका फेम सावली अभिनेत्री प्राप्ती रेडकर, सहकुटुंब सहपरिवार फेम अवनी अभिनेत्री साक्षी गांधी यांनी हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाची रंगत वाढवली. तर सुप्रसिद्ध निवेदक निलेश पापत यांनी कार्यक्रम बहारदार केला. हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या खेळात सहभागी महिलांमधील प्रथम १० विजेत्या महिलांना मानाची पैठणी आणि बक्षिसे देण्यात आली. तर उत्तेजनार्थ २५ महिलांना सोन्याची नथ आणि प्रेशर कुकर देण्यात आला. प्रथम क्रमांच्या विजेत्या नम्रता मालकर यांना मानाची पैठणी आणि फ्रिज, व्दितीय संतोषी मिरकुडे यांना मानाची पैठणी आणि टीव्ही, तृतीय श्रेया कुंभार यांना मानाची पैठणी आणि वॉशिंग मशीन देण्यात आली.या कार्यक्रमाला सुधाकर घारे यांच्यासह भगवान शेठ भोईर, अशोक शेठ भोपतराव, भरत भाई भगत, एकनाथ धुळे, विवेक चौधरी, सुरेश पाटील, आर. के. कोळंबे, अरुण बंदे, प्रसाद सावंत, दीपक श्रीखंडे आदी उपस्थित होते.

 

चौकट

खेळ पैठणीचामध्ये महिलांनी धरला संगीताच्या तालावर नृत्याचा ठेका !

अभिनेत्री प्राप्ती रेडकर व साक्षी गांधी यांच्या उपस्थितीने हा खेळ पैठणीचा कार्यक्रमाला रंगत आणली. यावेळी संगीताच्या तालावर अभिनेत्रींनी नृत्य सादर केले. यावेळी उपस्थित महिलांनी देखील संगीताच्या तालावर नृत्याचा ठेका धरला. महिलांच्या उत्फुर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.
Comments