सुधागड विद्या संकुलात 'वीर पत्नीच्या' हस्ते ध्वजारोहण, लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारली, प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा..
           प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा..

पनवेल वैभव वृत्त : - कळंबोली (दीपक घोसाळकर): देशाच्या ७६ वा प्रजासत्ताक दिन कळंबोलीतील सुधागड विद्यालयात उत्साहाच्या वातावरणात व विविध सांस्कृतिक उपक्रमाने साजरा करण्यात आला .या प्रजासत्ताक दिनी सिक्किम येथील ढगफुटीत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या वीर पत्नीच्या हस्ते सुधागड विद्या संकुलात ध्वजारोहण करण्यात आले . सुधागड विद्या संकुलाच्या गेल्या चार दशकांमध्ये ही प्रथमच देशाभिमान दाखवणारी संकल्पना विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी घडवून आणली. या संकल्पनेचे समाजातील विविध स्थरांतून स्वागत करून विद्यालयाला धन्यवाद दिले जात आहेत.
        कळंबोली येथील सुधागड विद्या संकुलात तब्बल बारा हजाराही पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ही मोठ्या संख्येने कार्यरत आहे. अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील सुपुत्र सुयोग अशोक कांबळे हे अठरा वर्षापासून देशाच्या सैन्य दलातील १८ महार रेजिमेंट मध्ये सिक्कीम येथे देश सेवेच्या कर्तव्यावर कार्यरत होते. ४ ऑक्टोंबर २०२३ रोजी ढगफुटीने तिस्ता नदीला आलेल्या महापुरात  देश सेवा व कर्तव्य बजावताना वाहून गेल्याने ते देशासाठी शहीद झाले. अलिबागच्या या शहीद झालेल्या वीर सुपुत्राच्या  वीर पत्नी निशा सुयोग कांबळे यांना विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी विनंती करून ध्वजारोहणासाठी निमंत्रित केले होते. देशासाठी आपल्या पतीला वीरमरण आले असताना  अन दुःखाचे डोंगर कुटुंबावर कोसळले असताना सुद्धा देशाच्या तिरंग्यासाठी वीर पत्नीने  होकार देऊन ध्वजारोहणासाठी त्या प्रजासत्ताक दिनी  कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलात मध्ये आल्या .त्यांच्या हस्ते २६ जानेवारी चे ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर विद्यालयाच्या वतीने त्यांना शाल मायेची साडी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला  .एकीकडे अभिमानाने शहीद वीर पत्नीचा उर भरून येत असताना  दुःखाच्या अश्रूने यावेळी त्यांनी  वाट मोकळी करून दिली. यावेळी विद्यालयाचे प्रांगण व त्यात उपस्थित असलेल्या सर्वांच्याच डोळ्याच्या पापण्या कडाडल्या.यावेळी विद्यालयाकडून लाल किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती विद्यालयातील कलाशिक्षक सय्यद व सहाय्यक शिक्षकांकडून साकारण्यात आली होती.त्यामुळे या प्रजासत्ताक दिनाला एक विशेष महत्त्व विद्यालयात तसेच पनवेलमध्ये प्राप्त झाले होते. प्रजासत्ताक दिनी विद्यालयातील चिमुकल्यान पासून ते उच्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन  साकारले होते. संत, महात्मा, क्रांतिकारक, शिवराय लोकमान्य टिळक जिजाऊ झाशीची राणी सुभाष चंद्र बोस क्रांतिकारक  यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी पथ संचलनामध्ये साकारली होती.


चौकट:
देशाच्या स्वातंत्र्याचा  प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना  सुधागड विद्या संकुलात ध्वजारोहणासाठी शहीद वीर पुत्र सुयोग कांबळे यांच्या विर पत्नी निशा सुयोग कांबळे यांना  निमंत्रित करण्याचे भाग्य आम्हाला लाभलं हे आमच्या विद्यालयासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे .आमच्या निमंत्रणाला मान देऊन दुःखाचा डोंगर कुटुंबावर असतानाही त्या ध्वजारोहणासाठी आल्याने आमच्या विद्यालयाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात नोंद होणारी घटना  लिहिण्या सारखेच आहे .याबद्दल आम्हाला व आमच्या सर्व सहकारी बंधूंना अभिमानही वाटत आहे .विद्यालयाच्या प्रांगणात लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याची संकल्पना आमच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याने त्याचाही आनंद आमच्या सर्वच संकुला मधील कर्मचारी वर्गाला आहे.

श्री. राजेंद्र बाजीराव पालवे,
प्राचार्य ,सुधागड विद्या संकुल,
कळंबोली, पनवेल रायगड. 
Comments