२.५ वर्षांच्या कर्णबधीर मुलीला मिळाली श्रवणशक्ती
नवी मुंबई / पनवेल वैभव वृत्त - : जन्मजात कर्णबधिर रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया ही पहिल्यांदाच नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली आहे. मेडिकवर हॉस्पिटलमधील ईएनटी सर्जन डॉ. राजेंद्र वाघेला यांच्या नेतृत्वाखालील तसेच डॉ. संजीव बधवार (KDAH) यांच्या मार्गदर्शनाखाली टिमने जन्मजात श्रवणशक्ती कमकुवत असलेल्या २.५ वर्षांच्या बाळावर यशस्वी कॉक्लियर-इम्प्लांट शस्त्रक्रिया केली. अतिशय नाजूक समजल्या जाणाऱ्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे कानाच्या मागील हाडामध्ये एक यंत्र बसविले जाते. ज्यामुळे कर्णबधिरता दूर करण्यास मदत होते.
महाड येथे राहणाऱ्या अडीच वर्षीय अनिका (नाव बदलले आहे)* हिची जन्मतःच श्रवणशक्ती कमकुवत होती. ती मानसिक आणि बौध्दीकदृष्ट्या सक्षम असूनही ऐकू आणि बोलता येत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करत होती. टाळ्या वाजविल्यास किंवा खेळताना ती योग्य प्रतिसाद देऊ शकत नव्हती. तिच्या पालकांनी एका ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेतला आणि वयाच्या पहिल्याच वर्षी तिची बेरा (BERA) चाचणी करण्यात आल्या. बेरा चाचण्यांमुळे जन्मजात बहिरेपणा तात्काळ स्पष्ट होऊ शकतो. महाडमध्ये सुविधांची उपलब्धता नसल्याने आणि कुटुंबाची सामाजिक-आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने तिच्यावर त्वरीत उपचार झाले नाही. सुदैवाने, तिच्या पालकांनी मेडिकवर हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि मग इथुन पुढे तिचा नवा प्रवास सुरु झाला.
*डॉ. राजेंद्र वाघेला( ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन) सांगतात की,* या बाळाला जन्मजात श्रवणदोष होता. जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात बाळाला श्रवणदोषाचे निदान झाले असले तरी, आर्थिक अडचणींमुळे त्यांना लवकरात लवकर उपचार करता आले नाहीत. सुमारे १००० मुलांपैकी ५ ते ६ मुलांमध्ये श्रवणदोषाच्या समस्या आढळून येतात. सर्व नवजात बाळांची OAE (ओटो-अॅकॉस्टिक इमिशन्स) तपासणी करणे खूप गरजेचे आहे. त्यात जर काही समस्या आढळून आली तर बेरा (BERA) चाचणी करणे गरजेचे आहे. ही चाचणी केल्यानंतर उजवा आणि डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता किती आहे हे श्रवण आलेखाद्वारे समजते, श्रवण आलेखावरून कर्णबधिर व्यक्तींचं अपंगत्व किती आहे हे ठरवले जाते. याचे वेळीच निदान करणे गरजेचे असून वयाच्या तीन वर्षांच्या आत शस्त्रक्रिया करावी
कॉक्लिअर इम्प्लान्ट ही शस्त्रक्रिया कमी वयाच्या मूक- बधीर / कर्णबधीर रुग्णांसाठी वरदान आहे. 'कॉक्लिअर इम्प्लान्ट' हे एक लहान स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते बसविल्यामुळे लहान मुलांमधील कर्णबधिरता दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. वरील प्रकरणात वेळीच निदान आणि उपचार केल्याने चिमुरडीला श्रवण क्षमतेचे वरदान मिळाले. कॉक्लियर इम्प्लांटने गंभीर श्रवणदोष असलेल्या रुग्णांना नवे आयुष्य मिळते. मुंबईसारख्या शहरी भागात अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत, परंतु नवी मुंबई आणि रायगडमध्ये या प्रक्रिया दुर्मिळ आहेत.
कॉक्लियर इम्प्लांट (CI) शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्यानंतर या रुग्णाची सखोल तपासणी करण्यात आली आणि शस्त्रक्रियेसाठी तिला तयार करण्यात आले. अतिशय नाजूक समजल्या जाणाऱ्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे कानाच्या मागील हाडामध्ये एक यंत्र बसविले जाते. त्याद्वारे बाहेरील ध्वनिलहरीचे इलेक्ट्रिक ध्वनिलहरीत रूपांतर होऊन जन्मजात कर्णबधिर बालकाला ऐकू येण्यास चालना मिळते.
*डॉ. राजेंद्र वाघेला( ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन) पुढे सांगतात की,* या यशस्वी प्रक्रियेने तिला ऐकू येऊ लागले असून तिला ऐकुन बोलता यावे यासाठी एव्हीटी थेरपी (AVT- Auditory Verbal Therapy) गरजेची आहे. कारण तिचे ऐकण्याचे वय अजूनही 3 महिन्यांच्या बाळासारखे आहे. यामुळे या थेरेपीने ती सर्वसामान्य मुलांसारखे जीवन जगू शकते. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांट (CI) शस्त्रक्रिया मोफत केली जाते. नवी मुंबई आणि रायगड भागातील रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्यसेवा मिळाव्यात याकरिता मेडिकवर रुग्णालय नेहमीच प्रयत्नशील असते. यशस्वी शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या थेरपीमुळे रुग्णाची ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता विकसित होण्यात मदत होईल. यामुळे या बाळाला सामान्य आयुष्य जगता येईल तसेच शाळेत जाता येईल आणि तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कोणतेही अडथळे येणार नाही.
*रुग्णाच्या पालकांनी या प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त करतना सांगितले,* जेव्हा आमची मुलगी टाळ्या वाजविल्यानंतर ,गाणी ऐकवल्यावर, शिट्ट्या वाजविल्यावर किंवा खेळण्यांचा आवाजाला प्रतिसाद देत नव्हती तेव्हा तिला पाहून आम्ही खुप खचून गेलो होतो. तिच्या सभोवतालच्या जगाला प्रतिसाद देण्यासाठी तिला करावा लागणारा संघर्ष पाहणे हे आमच्यासाठी खरोखरच वेदनादायक होते. तिला ऐकू येत नसल्याने किंवा बोलता येत नसल्याने तिला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल याचा विचार करुनच आम्ही खुप घाबरुन गेलो होते. पण कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली.या संपुर्ण प्रवासात आमच्या सोबतीने उभ्या असलेल्या मेडिकवर हॉस्पिटलच्या संपुर्ण टिमचे आम्ही आभार मानतो. आता आमची मुलगी एक सामान्य व आनंदी जीवन जगू शकेल अशी आम्ही आशा करतो.