कर्मवीर अण्णांनी एक मिशन म्हणून काम केले - रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार ...
कर्मवीर अण्णांनी एक मिशन म्हणून काम केले - रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार 
पनवेल (हरेश साठे) शिक्षण व त्या अनुषंगाने ज्ञान समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून कर्मवीर अण्णांनी एक मिशन म्हणून काम केले, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वावंजे येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या वावंजे येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीराम पाटील कॉमर्स सायन्स ज्युनिअर कॉलेज व लक्ष्मण अर्जुन पाटील परी प्रायमरी इंग्लिश स्कुलच्या नवीन इमारतीचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी कऱण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
            या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, थोर देणगीदार व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख, एन. डी. पाटील यांचे चिरंजीव प्रशांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, माजी सचिव व प्राचार्य गणेश ठाकूर, विठ्ठल शिवणकर, स्थानिक शुल्क कमिटी चेअरमन जी. आर.पाटील, पंकज पाटील, डी . बी. म्हात्रे, एम. डी. पाटील, वासुदेव चोरमेकर, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 
           शरद पवार यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचविण्यासाठी कर्मवीर अण्णांनी शिक्षण संस्था उभी केली आणि लक्षावधी विद्यार्थी हे जीवनाच्या विविध क्षेत्रामधील शिक्षण घेऊन अतिशय मोलाची कामगिरी करत आहे. त्यांची तयारी कर्मवीरांच्या विचारातून झाली आणि या विचाराचा विस्तार होत आहे. एक काळ असा होता कि हा विस्तार सातारा, कोल्हापूर व सांगली अशा विभागात होत होता. रायगड जिल्हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची अधिक गरज असल्याची नोंद एन. डी. पाटील यांनी घेतली. आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्हयात ३७ च्या आसपास शाखा उभारण्यात संस्था यशस्वी झाली आणि याचे श्रेय एन. डी . पाटील यांना द्यावे लागेल. त्या नंतरच्या काळात दि. बा. पाटील आणि अन्य सहकाऱ्यांची यामध्ये मेहनत आहे. एकेकाकी रायगड जिल्हा शेतीचा म्हणून ओळखला जायचा पण आता रायगडचा चेहरा बदलला आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ अनेक कारखाने उभे राहत आहेत त्या अनुषंगाने हजारो उद्योग निर्माण होत आहे, त्यानुसार स्थानिक माणसाला संधी मिळणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षणाचे वजन मोठे असते. त्यामुळे शिक्षण आणि आत्मविश्वासाने ज्ञानार्जन करण्याची गरज लक्षात घेऊन संस्थेने कात टाकली असून त्यानुसार आधुनिक शिक्षणाची कास धरली आहे, असे अधोरेखित करून संस्थेतील सहकाऱ्यांना धन्यवाद दिले. 
             संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, एखाद्या शाखेची नवीन इमारत उभी राहते तेव्हा ती शाखेसाठी गर्वाची बाब असते. सुंदर इमारत आणि व्यवस्था चांगली आहे या ठिकाणी १४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाखेसाठी जमीन देण्यापासून ते इमारत उभी करण्यासाठी गेल्या ४०- ५० वर्षात योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करणे गरजेचे आहे. गेली ३६ वर्षे शरद पवारसाहेब रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत. संस्थेच्या ७५० शाखा आहेत त्यातील ५० टक्केपेक्षा जास्त शाखा त्यांच्या या कार्यकाळात सुरु झाल्या आहेत. बघता बघता साडेचार लाख विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. हि संस्था देशातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. आणि संस्थेला उंची देण्याचे काम कर्मवीर अण्णांच्या आशीर्वादाने पवार साहेबांनी केले आहे. आणि त्यांच्यासोबत योगदान देणाऱ्या रयत सेवकांचे आभार मानू तेवढे कमी आहेत. आता संस्था यापुढची झेप घ्यायला सज्ज झाली आहे त्यानुसार प्रत्येक शाखेत इंटरॅक्टिव्ह पॅनल तसेच एआय प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे नमूद करत संस्था काळानुसार कार्यरत असल्याचे अधोरेखित केले. 
         कर्मवीर अण्णांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेला १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची देणगी देणारे संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ रामशेठ ठाकूर यांनी आपले विचार मांडताना कर्मवीर अण्णांच्या कार्याला उजाळा दिला. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था उभारली या संस्थेच्या ७५० शाखा झाल्या आहेत. कर्मवीर अण्णांनी जी मुहूर्तमेढ रोवली आणि त्यातून त्यांनी खेडोपाड्यात अत्यंत दुर्गम भागात जाऊन शाखा उभारण्याचे काम केले आणि त्या मेहनतीने वाढवल्या. आजच्या काळात आपल्याला बऱ्याचशा सुखसुविधा मिळतात आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाही आणि सहकार्य मिळते. पण त्या काळात असे काहीही नसताना मेहनत घेऊन त्यांनी संस्था वाढवली. आणि शरद पवारसाहेब जेव्हा संस्थेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून या संस्थेने अतिशय जोमाने सर्व क्षेत्रात प्रगतीच्या बाबतीत यशस्वीपणे पाऊले टाकली. पवारसाहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करत असताना शिक्षण आणि संस्थेच्या विकासासाठी कायम लक्ष देत असतात. आणि त्या अनुषंगाने त्यांनी अनेक प्रयोग संस्थेमध्ये घडवून आणतात. शिक्षणाच्या दृष्टीने सात आठ वर्षांपूर्वी पुण्यामध्ये अशाच प्रकारे 'थिंक टॅंक' नावाने एक प्रकल्प सुरु केला. त्यामध्ये शास्त्रज्ञ श्री. माशेलकर, सरकारी अधिकारी व विचारवंताची एक परिषद घेतली आणि त्या अनुषंगाने आता संस्थेला इंग्रजी माध्यमाकडे वळले पाहिजे तर सुप्रिया सुळे यांनी सीबीएसईकडे कळ दिला पाहिजे अशी सूचना केली आणि त्या दृष्टिकोनातून हि पाऊले उचलायला सुरुवात झाली. आणि आता संस्थेच्या अनेक शाखांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरु झाला आहे. आज जी. आर. पाटील यांनी इंग्रजी माध्यमाची प्री प्रायमरी स्कुल सुरु केले आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आधुनिकरणाच्या युगात जग जवळ आला आहे. मराठी भाषेचा आपल्या प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे. जागतिक स्तरावर काम करायचे असेल तर इंग्रजी भाषा आत्मसात केली पाहिजे. जी. आर. पाटील व्यक्ती सर्वांना माहिती आहे. गप्प बसणारा माणूस नाही एकदा कामाला लागला कि अफाट पळतो. संस्थेच्या कामाला गेले असताना अपघात झाला होता आणि बरेच दिवस अंथरुणाला होता पण गाडी थांबली नाही परत धावपळ त्यांनी केली. आणि शंभर ठिकाणी जाऊन देणगी घेतली पण त्यांना कुणीही नाही म्हणू शकले नाही. यापूर्वीची इमारत बांधताना या ठिकाणी साधी पाण्याची टाकी कुठे बसवायची असा प्रश्न होता मात्र तशा परिस्थितीतही इमारत उभारली आणि त्या इमारतीसाठी मला ५० लाख रुपये मदत करता आली आणि त्याच अनुषंगाने आताची आणखी नवीन इमारत बांधताना मेहनत जी. आर. पाटील यानी घेतली आहे, असेही नमूद करत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सतत काम करत राहू या, असे आवाहनही लोकनेते रामशेठ रामशेठ ठाकूर यांनी केले. 
       यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन जी. आर. पाटील यांनी सांगितले कि, वावंजे अत्यंत दुर्गम भाग होता. या विभागात दि. बा. पाटील, दत्तूशेठ, जनार्दन भगत, वाजेकरशेठ, झिपरूशेठ, गोटीराम पाटील यांनी ११ विद्यालये उभारली त्यामुळे या भागाचा विकास झाला.अनेक वर्षाचा काळ लोटल्यानंतर वावंजे विद्यालयाच्या वास्तूची परिस्थिती बिकट झाली. दरवाजे खिडक्या सुद्धा नव्हत्या. वावंजे विद्यालयाची पडकी इमारत होती. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मला सांगितले तुम्ही इमारत का बांधत नाही मी शेठना सांगितले तुम्ही मला शक्य तेवढी मदत करा मी इमारत बांधतो रामशेठ ठाकूर यांनी त्यावेळी मला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली त्यामुळे हि भव्य इमारत उभी राहिली त्यामुळे खऱ्या अर्थाने वावंजे हायस्कुलला पुनर्जीवित करण्याचे काम माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले असल्याचेही जी. आर. पाटील त्यांनी सांगितले तसेच खासदार असतानाही त्यांनी खासदार निधी दिल्याची आठवणही पाटील यांनी काढली.
-----------------------------------------------------------------
Comments
Popular posts
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवचरित्राचा भव्यदिव्य कार्यक्रम ...
Image
पनवेलमध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे नवीन शोरूम...
Image
नवं वर्ष स्वागत समिती आयोजित भव्य दिव्य शोभा यात्रेच्या स्वागतासाठी आ.विक्रांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य महाकुंभ नगरी साकार...
Image
नैना प्रभावित क्षेत्रातील बंद असलेले खरेदी विक्री रेजिस्ट्रेशन त्वरित सुरु करणे संदर्भात आ.विक्रांत पाटील यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सकारात्मक चर्चा...
Image