शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांचा वारसा जपणार
कळंबोली / (पनवेल वैभव) - : रायगड सह नवी मुंबईत ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली ही संस्था गेली अनेक दशकापासून करीत आहे .शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी सन १९४१ मध्ये लावलेल्या या शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झालेले आहे . सद्यस्थितीत कै. वसंतराव ओसवाल यांच्या नंतर संस्थेचे अध्यक्ष पद हे रिक्त झालेले आहे. मात्र संस्थेचे अध्यक्ष पद हे निवडत असताना गट तट ,पक्षीय राजकारण किंवा इलेक्शन असे कोणतेही प्रकार न करता संस्थेचे अध्यक्षपदाचे सिलेक्शन व्हावे. संस्थेचे सभासद, संस्थेचे संचालक मंडळ, पालक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व हितचिंतक यांच्या सर्वानुमते संस्थेचे अध्यक्षपद हे निवडले जावे.
शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा वारसा हा निरंतर सुरू राहिला पाहिजे. त्यांनी केलेल्या योगदानाचा व त्यागाचा विचार करून व मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याचा असलेल्या अनुभवाच्या शिदोरीवर आगामी काळात मला संस्थेचे अध्यक्षपद सक्षमपणे स्वीकारण्यास इच्छुक असून शिक्षण महर्षींचा ज्ञानदानाचा पवित्र कार्याचा वारसा मी जपणार असल्याचे सुतोवाच संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष व शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांचे नातु रवींद्र अरविंद लिमये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सुधागड एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद हे सद्यस्थितीत रिक्त आहे. आगामी काळात संस्थेचे अध्यक्षपद निवडी बाबत त्यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे संस्थेचे सभासद संचालक पालक शिक्षक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला आहे. या माध्यमातून ते म्हणाले आहेत की सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे कै.दादासाहेब लिमये आणि कै.वसंतशेठ ओसवाल यांच्या बरोबर व मार्गदर्शनाखाली काम केले आहे .
सुधागड एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद हे सद्यस्थितीत रिक्त आहे. आगामी काळात संस्थेचे अध्यक्षपद निवडी बाबत त्यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे संस्थेचे सभासद संचालक पालक शिक्षक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला आहे. या माध्यमातून ते म्हणाले आहेत की सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे कै.दादासाहेब लिमये आणि कै.वसंतशेठ ओसवाल यांच्या बरोबर व मार्गदर्शनाखाली काम केले आहे .
सदर कालावधीत काम करत असताना कोणत्याही आर्थिक , सामाजिक , पक्षीय , राजकीय पक्षांच्या बंधनांचा अडसर न करता केवळ संस्थेच्या हिताच्या दृष्टीने रायगड जिल्हयातील सर्व भागातील लोकांना , ग्रामस्थांना , सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , नेते यांना बरोबर घेऊन ग्रामीण तसेच शहरी भागात शाळा काढून तळागाळात प्राथमिक शिक्षण पोहचविण्याचे कार्य करून रायगड जिल्हा व जिल्हयाबाहेर सुधागड एज्युकेशन सोसायटी ही एक नामांकित संस्था म्हणून नावलौकिक मिळवून दिला आहे . सध्या संस्थेचे माजी अध्यक्ष कै . वसंतशेठ ओसवाल यांच्या निधनानंतर संस्था अध्यक्ष पद रिक्त असल्यामुळे अध्यक्षाची निवड करणे आवश्यक आहे . सदर निवड ही घटनेनुसार सर्व संचालक मंडळ , सभासद यांचे सर्व संमतीने व्हावी असे माझे मत आहे . त्याप्रमाणे पुढील सभेचे नियोजन करता येईल . संस्थेच्या घटनेप्रमाणे संस्था अध्यक्षांची निवड ही सर्वसाधारण सभेमध्ये ठरवावी असे आहे . काही कारणानी अध्यक्षपद रिक्त झाल्यास संचालक मंडळाने अध्यक्ष / अगर इतर पदाधिकारी निवडावा व त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे बंधनकारक आहे . त्याप्रमाणे अध्यक्षाची निवड करणे व इतर विषयांबाबत विचारविनीमय करून दिनांक १३/०२/२०२५ रोजी सभा निश्चित करण्यात आली होती . परंतु त्या सभेस संचालक मंडळातील सभासदांनी गैरहजेरी लावली व कोरम अभावी सभेमध्ये निर्णय होऊ शकला नाही. त्यामागील उद्देश समजू शकला नाही. त्यामुळे पुनःश्च संचालक मंडळाची सभा आयोजित करून निर्णय घेण्याबाबत विचार चालू आहे व तशी सभा आयोजित करणे / सर्व सभासद देणगीदार , वर्गणीदार व इतर सर्वांची सर्वसाधारण सभा देखील आयोजित करण्याच्या दृष्टीने व संस्थाहिताच्या दृष्टीने पुढील वाटचाल करण्याच्या कामी निर्णय एकतर्फी न घेता आपणा सर्वांची मते , प्रतिक्रिया , अभिप्राय जाणून घ्यावे असे माझे वैयक्तिक मत आहे .
सुधागड एज्युकेशन सोसायटी ही केवळ संचालक मंडळाची नसून संस्थेशी निगडीत विद्यार्थांचे पालक , ग्रामस्थ , संस्थेचे हितचिंतक त्या सर्वांच्या सहकार्याने , सहयोगाने संस्था वाढलेली आहे संचालक मंडळ हे आम्ही सर्व केवळ प्रतिनिधी आहोत. त्यामुळे सदर संस्थेची पुढील वाटचाल कशातऱ्हेने व्हावी हे ठरवण्याच्या दृष्टीने हे आवाहन आपणा सर्वांना करीत आहे . संस्थेच्या प्रगतीची दिशा ठरवण्याचा अधिकार हा संस्थेच्या सर्व हितचिंतकांना असल्याने त्यांच्या मताला अनन्यसाधारण महत्व आहे .
संचालकांचे एकत्र प्रयत्नाने संस्था प्रगतीपथावर नेणे आपले प्रथम कर्तव्य आहे . कोणत्याही प्रकारे एक पक्ष , गट , सत्ता केंद्र , हया पलीकडे सर्व समावेशक शैक्षणिक उद्देश प्रथम ठेऊन , आर्थिक समतोल हा आवश्यक गरजेनुसार साधत संस्था , शाळा , विदयार्थी , कर्मचारी , त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण हे उद्देश कायम राहावे . हया सर्व घडामोडी घडत असताना पदाधिकारी , कर्मचारी , विदयार्थी बदलत असतील पण संस्था आजपर्यंत चालतच आहे , ती पुढे देखील अशीच चालू रहावी ही प्रामाणिक इच्छा आहे . मी हयाचे आधी देखील या संस्थेचा एक घटक राहिलेलो आहे. त्यामुळे ही संस्था पुढे नेण्यासाठी मी हयाचे पुढे देखील प्रामाणिक प्रयत्न करीन . सर्व संचालक मंडळ , सर्व पक्षीय सदस्य , ग्रामस्थ , कर्मचारी यांचे मध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन माझे परीने न्याय देण्याचा प्रयत्न करीन . कै . शिक्षण महर्षी व आदिवासी सेवक दादासाहेब लिमये यांनी अदिवासी पाड्यांच्या नसानसांत शिक्षणाचे वारे पोहचवून , त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे असामान्य कार्य केले . १९४१ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीमार्फत त्यांनी रायगड जिल्हयाच्या शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे ४० शिक्षण संस्था स्थापन केल्या , त्यांच्या कार्याचा वारसा चालवणे ही आजच्या काळाची गरज आहे . हयाच विचारांनी मी आजपर्यंत काम करत आहे व करत राहीन हयासाठी संस्था अध्यक्ष म्हणून होणाऱ्या निवड प्रक्रियेत मी सहभागी होऊ इच्छितो . निवड प्रक्रिया सिलेक्शन ने व्हावी , इलेक्शन ने नको असे मला वाटते . या मध्ये इतर कोणत्याही घटकांना संधी मिळू नये , तसेच हा कोणत्याही प्रकारे आखाडा होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे .तरी आपण सर्व संचालक मंडळाचे सदस्य , संस्थेचे सभासद , संस्थेचे हितचिंतक तसेच संपूर्ण सुधागडवासियांनी शिक्षण महर्षी कै . दादासाहेब लिमये व त्यांचे कुटुंबीयांनी केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करावा व मला पुढील कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून निवड करून काम करण्याची संधी दयावी असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र अरविंद लिमये यांनी केले आहे.