शाहू बोर्डिंगसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून ५० लाख रुपयांची देणगी जाहीर
पनवेल (प्रतिनिधी) ज्या प्रमाणे वारकर्यांना पंढरीत गेल्यावर आनंद होतो, तोच आनंद आम्हाला धनिणीच्या बागेत आल्यावर होतो. त्यामुळे धनिणीची बाग ही रयत शिक्षण संस्थेची पंढरी आहे, असे उद्गार संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, थोर देणगीदार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातारा येथे काढले. रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या या कार्यक्रमास संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्मवीर अण्णा, लक्ष्मीवहिनी यांच्या वसतिगृहातील प्रसंगावर आधारित रेखाटलेल्या म्युरल शिल्पाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी शाहू बोर्डिंगसाठी ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉ. अनिल पाटील यांचे कौतुक केले. ते म्हणाले, डॉ. अनिल पाटील यांनी शाहू बोर्डिंगला नवे रूप दिले आहे. बोर्डिंगमधील शिस्त, नीटनेटकेपणा जगाने शिकण्यासारखा आहे. डॉ. पाटील यांच्या प्रयत्नातून धनिणीच्या बागेत डिजिटल चलचित्राच्या स्वरूपात कर्मवीर अण्णांचे चरित्र रेखाटले आहे. यातून अनेकांना रयत शिक्षण संस्थेचा इतिहास माहीत होणार आहे.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले की, वहिनींना अधिक आयुष्य लाभले असते तर संस्थेचे आजचे चित्र आणखी वेगळे दिसले असते. कर्मवीरांना रयत माऊलींनी दिलेली साथ अत्यंत महत्त्वाची आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले तसेच कार्य कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई यांनी केली आहे. लक्ष्मीवहिनींच्या निधनानंतरही कर्मवीर अण्णांनी संस्थेसाठी रात्रंदिवस काम केले. वहिनींची साथ अधिक मिळाली असती, तर संस्था आणखी पुढे गेली असती.
या वेळी चेअरमन दळवी यांनी डॉ. अनिल पाटील यांचे कौतुक केले तसेच त्यांना कर्मवीर अण्णा, रयतमाऊली लक्ष्मीबाई आणि रयत शिक्षण संस्था यावर एक पुस्तक लिहून आपले ज्ञान सर्वांपर्यंत पोहचवण्याची विनंती केली.
संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील म्हणाले की, लक्ष्मीवहिनींना अवघ्या 36 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी अंगावरील सर्व दागिने वसतिगृहातील मुलांसाठी खर्च केले. शेवटचा दागिना मंगळसूत्र तेही विकून टाकले. या त्यागावरच संस्था उभी आहे. वहिनींना जे दागिने केले जायचे ते त्यांचा भाऊ कलगोंडा पाटील करीत होते. त्यांनी केलेल्या दागिन्यांचा उपयोग अण्णांनी संस्थेसाठी केला. सध्या या बार्डिंगमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची मुले राहत असून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. या वेळी स्व. कलगौंडा पाटील यांनी केलेल्या समर्पित त्यागाबद्दल त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. हा सन्मान संजीवकुमार पाटील, अशोक कलगौंडा पाटील, अनिल कलगौंडा पाटील यांनी स्वीकारला. धनिणीच्या बागेत डिजिटल स्वरूपात रयत शिक्षण संस्थेच्या महत्त्वाच्या घटना दर्शवणारे बोर्ड, शिल्प इत्यादी करण्यात योगदान देणार्या विनायक संकपाळ, प्रदीप कुंभार, उमेश देशमुख, बाळासाहेब कचरे, किरण कुंभार या कला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
साहेबराव घाडगे या सेवानिवृत्त शिक्षकाने एक लाख पाच हजार रुपयांची देणगी दिली. पल्लवी सागर वर्धमाने, सहाय्यक विभागीय अधिकारी एन.टी. निकम यांनी बोर्डिंगसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची देणगी दिली. रा.ब. काळे शाळेच्या पालकांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी जमवलेला ७५ हजार रुपयांचा लक्ष्मीफंड संस्थेकडे सुपूर्द केला.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. वसतिगृहाचे अधीक्षक प्रशांत गुजरे यांनी अहवालवाचन व सूत्रसंचालन सविता मेनकुदळे यांनी केले, तर आभार सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी. बी. पाटील, डॉ. मोहन पाटील, कर्मवीर कुटुंबीय, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, बंडू पवार, प्राचार्य शहाजी डोंगरे, प्राचार्य आर.के. शिंदे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी लोकनेते रामशेठ ठाकूर
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा संपन्न झाली. या वेळी संस्थचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, थोर देणगीदार, मार्गदर्शक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या सभेस महाविद्यालयाचे प्राचार्य व माजी विद्यार्थी संघ व कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. राजेंद्र मोरे, संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य आर.के. शिंदे, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कार्यकारी मंडळाचे सदस्य शहाजी डोंगरे, मेजर पी.एस. गायकवाड, उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख अनिलकुमार वावरे, संस्थेचे लाईफ मेंबर बोर्डाचे सेक्रेटरी व माजी विद्यार्थी संघ कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा. संदीप भुजबळ, माजी विद्यरार्थी संघाचे सचिव डॉ. अभिमान निमसे आदी उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.