शेतकरी नामदेव गोंधळी यांचा आत्मदहनाचा इशारा
नवीन पनवेल : वावंजे येथील शेतकरी नामदेव गोंधळी यांना गेल्या अनेक वर्षांपासून जमीन फसवणूक प्रकरणात न्याय मिळत नाही, त्यामुळे आता न्याय मिळाला नाही तर विधानभवनात जाऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी सहा मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
वावंजे येथील जमीन फसवणूक प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. त्यांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी अशा अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केले मात्र अद्याप देखील न्याय मिळाला नसल्याचे गोंधळी यांनी सांगितले. सरकार दरबारी प्रत्येक पातळीवर त्यांच्या पदरात केवळ आश्वासनेच पडली आहेत. फेब्रुवारी महिन्यात पनवेल मध्ये झालेल्या आमसभेत त्यांनी तीन आमदारांना पत्र देऊन या प्रकरणी न्याय देण्याची विनंती केली होती. गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला होता. यावेळी 2019 आधीच अधिसूचना लागलेली असून देखील शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. कॉरिडॉरचे मिळणारे पैसे भल्ला यांना देऊ नयेत अशा प्रकारचा पत्रव्यवहार उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केला असल्याचे गोंधळी यांनी यावेळी सांगितले. अंतिम विजय सत्याचाच होईल सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.