पनवेल शहरचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे १९९७ सालातील जप्त मुद्देमाल करण्यात आला परत...
पनवेल वैभव, दि.27 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध गुन्ह्यांची उकल केल्यामुळे अनेक गाव गुंडांना त्यांची धडकी बसली असतानाच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांच्या आदेशानुसार मुद्देमाल निर्गती मोहिमेंतर्गत त्यांनी 1997 साली गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले 17.50 तोळे वजनाचे दागिने सदर व्यक्तीला मुंबई येथून शोधून काढून परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. तसेच परिमंडळ 2 मधील हा महत्वाचा असा एकमेव गुन्हा असेल जो फक्त वपोनि यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने निकाली निघाला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर 518/1997 भादवि कलम 420,467,468,470 मधील आरोपी धीरज विनोदकुमार शहा व विनोदकुमार जीव लाल शहा यांचेकडून घर झडती पंचनाम्यामध्ये दागिने जप्त केले होते. सदरचा मुद्देमाल परत मिळवणेसाठी धीरज विनोदकुमार शहा यांनी मा. न्यायालयात अर्ज केला होता परंतु कालांतराने ते मयत झाल्याने त्याची आई यांनी मा. न्यायालयात अर्ज केला परंतु आई देखील मयत झाल्याने विनोदकुमार जीव लाल शहा यांनी अर्ज केला परंतु सदर मुद्देमाल परत मिळणे बाबत काही आदेश होत नसल्याने त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. परंतु सदर मुद्देमाल परत करणे बाबत 2017 मधे आदेश झाले होते परंतु त्याबाबत त्यांना काही माहीत नव्हते. दरम्यान सह.पोलीस आयुक्त संजय ऐनुपरे, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी बर्याच कालावधी पासून पोलीस स्टेशन येथे शिल्लक असलेल्या मुद्देलाल निर्गती करिता मोहीम काढली असता त्यांना सदर मुद्देमाल आढळून आल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कारकून म.पो.हवा.ज्योती दुधाने व मपोकॉ.सुशिला सवार यांनी सुद्धा मेहनत घेतली. अखेरीस विनोदकुमार जीव लाल शहा यांचा मुंबई येथील पत्त्याचा शोध घेऊन त्यांचे पोलीस ठाणे येथे जप्त असलेले 17.50 तोळे वजनाचे सोने मूळ मालक विनोद कुमार जिव लाल शहा रा मुंबई 14 दादर यांचे कडून मा.न्यायालयाची कायदेशीर कारवाई पूर्ण करून घेऊन वपोनि नितीन ठाकरे यांनी त्यांच्या ताब्यात दिले असता आपल्या वाडवडिलांचे खुप जुने असे पिढीजात दागिने फक्त वपोेनि यांनी पाठपुरावा केल्याने परत मिळाले असल्याचे आनंदाश्रू विनोदकुमार जीवलाल शहा यांच्या डोळ्यातून उभे राहिले होते. त्याबद्दल त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.