पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पशुवैद्यकीय फिरता दवाखाना...
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पशुवैद्यकीय फिरता दवाखाना


पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्राणी व पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, लहान-मोठ्या प्राण्यांच्या उपचार व आरोग्य सेवेसाठी पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रभागानुसार सेवा पोहोचवून प्राण्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे हा आहे.
             पनवेल महानगरपालिका हद्दीतील लहान मोठ्या प्राण्यांच्या उपचारासाठी व आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरु करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाळीव प्राणी व पशुपालकांची सोय होण्यासाठी प्रभागनिहाय वेळापत्रक जारी करण्यात येत आहे. 
नवीन पनवेल येथील पोदी याठिकाणी स्थित प्राणी निर्बिजीकरण केंद्रामध्ये भटक्या श्वानांसाठी व भटक्या मांजरींसाठी निर्बिजीकरण शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि प्राथमिक औषधोपचार करण्यात येत आहे. आता हि सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत वेळापत्रकानुसार पशुवैद्यकीय फिरता दवाखाना कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे शहरापासून दुरस्थ ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा प्राथमिक उपचार, आरोग्य शिबीर, छोट्या शस्त्रक्रिया, रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण, वैद्यकीय सल्ला मिळणे शक्य होणार असून नागरिकांना त्यांच्या प्रभागामध्ये चांगल्या दर्जाची पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. 
पशु आरोग्य सुधारल्याने प्राणीजन्य रोगांना आळा घालण्यास मदत होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० डेज मेक ओव्हर ड्राईव्ह अंतर्गत प्राण्यांसाठी रुग्णालय उभारणी बाबत केलेल्या सूचनांचे पालनही होणार आहे. "पशुवैद्यकीय फिरता दवाखाना" म्हणजे एक मोबाईल व्हेटरनरी क्लिनिक आहे, जे ग्रामीण किंवा दुर्गम भागांमध्येही जाऊन प्राण्यांवर उपचार करते. यामुळे दूरदूरच्या भागात वैद्यकीय सेवा पोहोचून पशुपालकांचा वेळ आणि खर्च वाचणार असून प्राण्यांचे आरोग्यमान चांगले राहण्यास मदत होणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे जनतेला स्थानिक पातळीवरच अत्यावश्यक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, प्राणी कल्याणासाठी ही एक सकारात्मक पावले ठरणार आहेत.
Comments