काश्मीर मधून सुखरुप परतणार्‍या पर्यटकांचे पनवेलमध्ये करण्यात आले स्वागत...
काश्मीर मधून सुखरुप परतणार्‍या पर्यटकांचे पनवेलमध्ये करण्यात आले स्वागत...
पनवेल वैभव, दि.24 (वार्ताहर) ः 
दोन दिवसापूर्वी पहलगाम येथे घडलेल्या घटनेमध्ये निसर्ग टुर्समधून पनवेल परिसरातील एकूण 39 पर्यटक येथे गेले होते. त्यापैकी आज 31 जण सुखरुपरित्या पनवेलमध्ये परतल्याने रात्री उशिरा त्यांचे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील व इतरांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
सदर पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी आ.विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा शासनाकडे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पाठपुरावा करून आज हे सर्व काश्मिर येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आले. त्यानंतर विशेष बसने त्यांना पनवेल येथे आणण्यात आले असता शहरातील प्रवेशद्वार गार्डन हॉटेल येथे त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून केले. यावेळी बोलताना निसर्ग टुर्सचे प्रमोद ओक यांनी सांगितले की, देवाच्या कृपेने आम्ही सर्व बचावलो. आणि आम्ही परत आलो. दुर्दैवाने आमच्यात उत्साही असणारे दिलीप देसले यांचे या घटनेत दुःखद निधन झाले ही मनाला चटका लावणारी घटना होती. परंतु शासनाने या घटनेनंतर आमच्या सातत्याने संपर्क राहिली व आज आम्ही सुखरुपपणे पनवेलला परतल्याचा आनंद होत आहे. 
तर या अनुभावाबाबत बोलताना संकेत वत्सराज यांनी सांगितले की, अत्यंत दुर्दैवी घटना होती. प्रथम गोळीबार झाला तेव्हा शिकारीसाठी गोळीबार झाला असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले. परंतु गोळीबार वाढत गेल्याने आम्हाला येथे काही वेगळेच घडत असल्याचे आम्हाला जाणवल्याने आम्ही डोंगरावर गेलो त्यामुळे बचावलो. त्यावेळी आमच्याबरोबर असणार्‍या घोडे चालकाने सुद्धा आम्हाला साथ दिल्याने आम्ही सुखरुपणे खाली आलो असल्याचे त्यांनी सांगितले. 21 तारखेला हे सर्वजण तेथे पोहोचले होते व 22 तारखेला ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर जीव मुठीत धरुन हे सर्वजण होते. केंद्रासह महाराष्ट्र शासनाने तेथील पर्यटकांना मोठी मदत केल्याने त्यांचे आभार मानले आहेत. 


फोटो ः बाळासाहेब पाटील स्वागत
Comments